“त्या माणसामुळे शरद पवारांची पावसातली सभा झाली”; दिड वर्षांनंतर सुप्रिया सुळेंनी फोडलं गुपित

0

 

 

२०१९ मध्ये विधानसभेच्या निवडणुकीत साताऱ्यात एक सभा झाली होती. त्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी भरपावसात भाषण केले होते. या पावसातील सभेमुळे राज्यातील राजकारणच पुर्ण पलटले होते. त्यावेळी सभेबद्दलची चर्चाही तेवढीच रंगली होती.

आता तब्बल दिड वर्षांनंतर या सभेचे एक गुपित खासदार सुप्रिया सुळे यांनी फोडलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांच्या पावसात झालेल्या सभेचे गुपित उघडले आहे.

साताऱ्यातील त्या सभेला शरद पवार नाही तर शशिकांत शिंदे जबाबदार आहेत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, त्या दिवशी शशिकांत शिंदे यांचा वाढदिवस होता. तेव्हा साताऱ्यात पाऊस सुरु होता. त्यामुळे सभा रद्द करण्याचा विचार सुरु होता.

संध्याकाळी मला शिंदे यांचा फोन आला होता, पण मी प्रचारात असल्याने मला फोन घेता आला नाही. पण जेव्हा नंतर मी शिंदे यांना फोन केला तर शिंदे मला म्हणाले, ताई सॉरी बोलण्यासाठी फोन केला होता.

मला प्रश्न पडला कि शिंदे असे का बोलत आहे. तेव्हा शिंदे यांनी सांगितले कि, ताई सभा झाली पवारसाहेब पुर्ण भिजले. मी कपाळालाच हात लावला. मी शिंदेना म्हणाले, अहो असं काय करताय, माझे वडिल ८० वर्षांचे आहे. त्यांच्या पायाला जखम झाली आहे.

शिंदे म्हणाले, मी आणि साहेबांनी मिळून ठरवले की काहीही झाले तरी सभा करायचीच. पुढे काय झालं असं विचारल्यावर शिंदे म्हणाले, काही नाही आता सभा झाली आहे. साहेब भिजले होते. आता साहेब तयार झाले असून आम्ही वाढदिवसाचा केक कापत आहोत. हे ऐकून मी शॉकच झाले होते, असा सर्व किस्सा सुप्रिया सुळे यांनी सांगितला आहे.

राज्याचे राजकारण बदलवणारी ती सभा शशिकांत शिंदे यांनी घडवून आणली होती, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यावेळी या साताऱ्याच्या सभेत शरद पवारांनी पावसात केलेले भाषण चांगलेच व्हायरल झाले होते. ही सभा साताऱ्यात १८ ऑक्टोबर २०१९ ला भरपावसात पार पडली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.