१२०० रुपयांची नोकरी करणारा गणेश आज करतोय कोट्यावधींची उलाढाल;वाचा कसं…

0

 

आजची ही गोष्ट आहे गणेश देशमुख यांची. जे सुरूवातीला एक क्लिनर म्हणून काम करत होते, मात्र आता त्यांच्या स्वतःकडेच १४ ट्रक आहे. स्वतःच्या मेहनतीवर आणि व्यवसाय पुढे नेण्याच्या जिद्दीवर त्यांनी हे यश मिळवले आहे.

गणेश यांचा जन्म १९८१ साली उस्मानाबादच्या इटा गावात एका गरीब कुटुंबात झाला. गणेश यांची परिस्थिती सुरवातीपासून हालाकीची होती. वडील पिठाच्या गिरणीत काम करत होते. तसेच त्यांच्यावर कर्ज देखील होतेच. त्यांच्याकडे स्वतःचे घरही नव्हते.

गणेश यांना शिक्षणाची आवड होती. पण परिस्थिती नसल्यामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही. त्यांनी ओढाताण करत १२ वी पर्यंत शिक्षण केले. पुढे त्यांना काही तरी काम करावे, कुटुंबासाठी काही करावे यांची चिंता सतावत होती.

पुढे १९९७-९८ ला गणेश यांनी गाडी शिकली. तसेच पुढे त्यांना क्लिनर म्हणून काम मिळाले. पुढे दोन वर्षांनी त्यांना इटा गावच्या एका प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व आण्णासाहेब देशमुख यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून नोकरी मिळाली. १२०० रुपये महिना असणारी ही नोकरी होती. ही गणेश यांची पहिली नोकरी असून यामुळे कुटुंबाची थोडीफार मदत होत होती.

तेव्हा गणेश यांचे पाच माणसांचे कुटुंब होते. बहिणीचे लग्न बाकी होते. डोक्यावर कर्ज होते, त्यामुळे गणेश यांना त्यांची ही परिस्थिती शांत बसू देत नव्हती. त्यामुळे त्यांनी ही नोकरी सोडून पुण्यात येण्याचा निर्णय घेतला.

गणेश हे पुण्यात तर आले मात्र त्यांच्याकडे ना नोकरी होती, ना घर.अशात त्यांना एका ठिकाणी ट्रक ड्रायव्हर म्हणून काम मिळाले. ते त्यांनी दोन वर्षे केले. त्याकाळात ते गाडीतच राहत होते. गणेश हे प्रामाणिकपणे कष्ट करत होते.

४ ते ५ वर्षे हे काम केल्यानंतर त्यांना पारस जैन नावाचा माणूस भेटला. त्यांना गणेश मेहनत जाणवत होती. तेव्हा त्यांनी गणेशला स्वतःचा ट्रक का घेत नाही? असे विचारले, तेव्हा त्यांनी ट्रक घेण्यासाठी पैसा हवा, तसेच ट्रक आला तरी काम कुठून मिळणार, अशी चिंता पारस यांच्यावर समोर व्यक्त केली.

गणेशची ही स्थिती पाहून त्यांनी गणेशला, लागेल ती मदत करतो, तू फक्त पुढाकार घेऊन काम सुरू कर असे सांगितले. गणेशने त्या माणसाचे ऐकले आणि एक ट्रक घेतला. तेव्हा गणेश यांनी पहिला ट्रक २००६ साली घेतला. तेव्हा तो ट्रक त्यांना २, १५,००० मिळाला. पारस जैन यांच्याच कंपनीसाठी गणेश यांनी गाडी लावण्यास सुरुवात केली.

तिथूनच गणेश यांचे नशीब पलटण्यास सुरुवात झाली. तेव्हा त्यांच्याकडे ट्रान्सपोर्टची बरीच कामे येऊ लागली. त्यामुळे गणेश यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करण्याचा निर्णय पक्का केला. ते त्याच दिशेने मेहनत घेऊन लागले.

गणेश हे अपघाताने या व्यवसायात आले होते, त्यामुळे सुरुवातीला त्यांनाही अडचणी येतच होत्या. मात्र त्या अनुभवाने गणेश यांना बरेच काही शिकवले. त्याच व्यवसायात असणाऱ्या एकही लोकांकडून गणेश यांच्या विरोधात अनेक अडचणी निर्माण केल्या जात होत्या, मात्र गणेश यांनी त्यांनाही कधीही उलटे उत्तर दिले नाही. त्यांनी संयमाची भूमिका घेतलेली होती.

गणेश हे नेहमीच प्रामाणिकपणे काम करत राहिले, पुढे त्यांचा उद्योग वाढायला लागला. तेव्हा इतर अनेक कंपन्यांनि त्यांना कामे देण्यास सुरुवात केली. २००७ मध्ये गणेश यांनी त्यांच्या आईवडिलांना पुण्यात बोलावून घेतले होते.

व्यवसायात मिळालेली भरभराटी नंतर गणेश यांनी आपल्या नातेवाईकांनाही या व्यवसायात बोलवून घेतले. आता त्यांचा एक ग्रुप आहे. ज्यात ४० ट्रक्स असून ते विविध कंपन्यांना सेवा देतात.

२०१५ साली गावकडे एक बंगला देखील बांधला आहे. तसेच आज त्यांच्याकडे पुण्यात स्वतःचे घर आहे. हळूहळू गणेश यांनी त्यांचे सर्व कर्ज फेडले. आज गणेश यांच्याकडे स्वतःच्या १४ ट्रक्स आहेत. तसेच त्यांच्या हाताखाली जवळपास २२ लोक काम करतात. १२०० रुपयांहून नोकरीची सुरुवात करणाऱ्या गणेश यांची आज ३ कोटींच्या जवळपास उलाढाल आहे. गणेश यांची ही गोष्ट नक्कीच अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

गणेश यांनी व्यवसायसोबतच समजाकार्य देखील केले आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो, म्हणून इटा, पखरूड, नळी, वडगाव, सुटका, अशा गावांमध्ये गणेश यांनी जवळपास ५०० शौचालय त्यांनक बांधून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.