भाड्याने रिक्षा चालवणार ‘हा’ माणूस आज आहे १२५ ट्रकांचा मालक

0

परिस्थीती कशीही असो माणसाची इच्छा शक्ती असेल, तर तो नक्कीच बदलू शकतो. आजची गोष्ट पण एका अशाच माणसाची आहे, ज्याला सुरुवातीला खुप संकटांचा सामना करावा लागला पण त्याच्यातील जिद्द आणि इच्छाशक्तीच्या समोर नशिबानेही हात टेकले.

या माणसाचे नाव प्यारे खान असे आहे. आज प्यारे खान नागपुरमधील प्रसिद्ध उद्योगपती आहे. काही वर्षांपुर्वी संत्री विकणारे, रिक्षा चालवणारे प्यारे खान आज ४०० कोटींची उलाढाल असणाऱ्या कंपनीचे मालक आहे.

प्यारे खान यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून ते अश्मी रोड ट्रान्सपोर्ट कंपनीचे मालक आहे. सध्या त्यांच्याकडे १२५ ट्रक आहे. तसेच हि कंपनी रोज जवळपास ३ हजारपेक्षा जास्त ट्रक ट्रान्सपोर्ट करण्यासाठी भाडे तत्वावर घेते.

आज त्यांनी उद्योगजगात चांगलेच यश मिळवले आहे, पण काही वर्षांपुर्वी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. खान लहानपणी नागपुरच्या झोपडपट्टीत आपल्या दोन भाऊ, बहिण आणि आई वडिलांसोबत राहत होते.

प्यारे खान यांचे वडिल खडोपाडी येथे कपडे विकण्याचे काम करायचे, पण या कामातून त्यांना जास्त पैसे मिळत नसल्याने त्यांनी हे काम बंद केले. त्यामुळे घरात पैसा यावा यासाठी त्याच्या आईंने किराणा दुकान उघडले.

प्यारे खान यांना लहानपणापासूनच आपल्या परिस्थीतीची जाणीव होती. त्यामुळे खान १२ वर्षाचे असतानाच त्यांनी काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीत स्टेशनवर संत्री विकण्याचे काम पण केले, त्यामधून त्यांना दिवसाला ५० रुपये मिळायचे, त्यांनी गाड्या साफ करण्याचे काम पण केले.

सगळ्या गोष्टींमुळे खान दहावीत नापास झाले आणि त्यामुळे त्यांनी शिक्षण सोडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एका कुरीयर कंपनीत काम करण्यास सुरुवात केली. तिथे त्यांचा अपघात झाला, त्यामुळे त्यांचे तिथले काम पण सुटले.

जेव्हा त्यांची प्रकृती ठिक झाली तेव्हा त्यांनी रिक्षा चालवण्यास सुरुवात केली. काही वर्षांनी त्यांनी आईचे दागिने विकले आणि स्वता:ची रिक्षा घेतली. २००१ पर्यंत ते रिक्षा चालवण्याचे काम केले पण त्यांना काहीतरी वेगळे करायचे होते.

त्यासाठी त्यांनी ४२ हजार ५०० रुपयांना रिक्षा विकून टाकली, मिळालेल्या पैशातून त्यांनी पर्फ्यु, कॅमेऱ्यासारख्या गोष्टी त्यांनी कोलकत्याहून आणल्या आणि त्या विकु लागले. त्यासोबतच ते आर्केस्टा वाजवण्याचे काम पण करायचे.

त्यावेळी त्यांचा ग्रुप वेगवेगळ्या टुरला जायचा. एकदा खान यांनी त्यांच्या शेठला विचारले की, मी जर बस खरेदी केली तर तुम्ही मला त्याचे भाडे द्याल का? या प्रश्नावर त्यांच्या शेठने होकार दिला. त्यासाठी खान यांनी कर्ज काढले, नातेवाईकांकडून पैसे घेतले आणि बस घेतली. मात्र ती पण काही जास्त काळ टिकली नाही आणि त्यामुळे त्यांना बस बंद करावी लागली.

पुढे त्यांनी ट्रक घेण्याची निर्णय घेतला. त्यामुळे त्यांनी कर्ज काढण्याचा प्रयत्न केला पण ते झोपडपट्टीत राहत असल्याने त्यांना बँकेने कर्ज नाकारले. पण त्यांनी बँकेच्या फेऱ्या थांबवल्या नाही. अखेर त्यांना बँकेकडून ११ लाखांचे कर्ज मिळाले आणि त्यांनी ट्रक घेतला.

ट्रक चालवण्यास सुरुवात झाली आणि तिथून त्यांनी कधीच मागे वळून नाही पाहिले. २००५ त्यांच्याकडे १ ते २ ट्रक घेतले, तर २००७ मध्ये त्यांच्याकडे १० ते १२ ट्रक झाले. आज त्यांच्याकडे १२५ ट्रक आहे, तर ४०० कोटींची वार्षिक उलाढाल या कंपनीची आहे.

माणसाच्या आयुष्यात अडचणी येत असतात, तसेच जेव्हा तो एखाद्या नवीन गोष्टीला सुरुवात करतो, तेव्हा त्याला अपयश पण येते. त्याच्यासोबत त्याची जिद्द असेल तर तो नक्कीच यशाचे शिखर गाठू शकतो, हे प्यारे खान यांनी दाखवून दिले आहे. प्यारे खान यांची हि गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.