पतीचे निधन झाल्यानंतर तिने सुरू केले थेट कुलीचे काम अन् बनली देशातली पहिली महिला कुली

0

आपण नेहमीच पुरुषांना अवजड कामे, हमालीची कामे, करताना बघतो. पण तुम्ही कधी महिला हमालाला पाहिलंय का? चला तर मग जाणून घेऊया देशातली पहिली महिला हमालाची गोष्ट.

या महिला कुलीचे नाव आहे मंजू देवी. मंजू जयपूरच्या रेल्वे स्टेशनवर कुलीचे काम करते. ती जयपूर स्टेशनवरची एकमात्र महिला कुली आहे. तिला तीन मुले असून त्यांच्या घरात ती एकटीच कमावणारी आहे.

पतीच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबाची आणि मुलांची जबाबदारी मंजूवर आली होती. त्यामुळे तिने कुली होण्याचा निर्णय घेतला होता. लोकांना एका महिला हमालाला पाहून जरा विचित्र वाटत असले तरी ती सगळ्या गोष्टींना न जुमानता आपले काम करते.

मंजू देवी रामजीपुरा कलाच्या सुंदरपुरा या गावात राहते. २० जानेवारी २०१८ मध्ये देशातल्या ९० महिलांना आपली वेगळी ओळख बनवण्यासाठी सन्मानित करण्यात आले होते.

त्यावेळी मंजू यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला होता. मंजू यांनी आपल्या आयुष्यात खूप संघर्ष केला आहे. जेव्हा ही सगळी गोष्ट राष्ट्रपतींनी ऐकली तेव्हा ते पण भावनिक झाले होते.

१३ वर्षांपूर्वी मंजुच्या पतीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे मंजू मानसिक तणावात होती. पण तेव्हा घरची परिस्थिती हलाकीची होती, त्यामुळे तिने हमालीचे काम सुरू केले. त्यासाठी तिला तिच्या आईनेही प्रोत्साहित केले होते.

हमालीच्या कामाला सुरुवात केली, तेव्हा कुठेही महिला कुली नसल्याने तिला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. महिला कुली नसल्याने रेल्वे अधिकाऱ्यांकडून देखील तिला लायसेन्ससाठी टाळाटाळ केली जात होती.

मंजू या आपल्या निर्णयावर ठाम होत्या, त्यामुळे त्यांना लायसेन्स देण्यात आले. त्यानंतर त्यांना बॅच क्रमांक देण्यात आला. पुढे तिने स्वतःसाठी कुलीचा युनिफॉर्म शिवून घेतला.

आपल्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी एक महिला कितीही अवजड काम करू शकते, हे मंजू देवी यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे मंजू देवी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी बनल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.