वाचा पुण्याच्या या तरुणाचा प्रवास; एकेकाळी होता सराईत गुन्हेगार आज आहे सामान्य माणूस

0

असे म्हणतात, माणूस वाईट नसतो त्याची परिस्थिती वाईट असते, त्यामुळेच माणूस वाईट बनत असतो. आपल्या परिस्थितीमुळे किंवा काही कारणांमुळे अनेक सामान्य नागरिक गुन्हेगारी क्षेत्राकडे वळताना दिसतात.

आजची ही गोष्ट अशा एका माणसाची आहे जो परिस्थितीमुळे गुन्हेगारी क्षेत्राकडे तर वळला पण आता तो पुन्हा सामान्य नागरिक म्हणून जगायला शिकला आहे. ही गोष्ट आहे पिंपरीच्या महादेव साठे या तरुणाची.

वाईट संगतीमुळे गुन्हेगारी क्षेत्रात तो गेला असल्याचे त्याने म्हटले आहे. त्याच्यावर १६ गुन्हे दाखल आहे. पण लग्नानंतर गुन्हेगारी सोडली आणि सामान्य माणूस जगण्यास सुरुवात केली.

गुन्हेगारी सोडल्यानंतर उपजीविकेसाठी दारूचा धंदा महादेव याने सुरू केला होता. पण तिथेही पोलिसांच्या धाड पडत असल्याने त्याने तो व्यवसाय सोडला. आता महादेवने एक पान टपरी टाकली असून तो एक सामान्य माणसाचे जीवन जगताना दिसून येत आहे.

महादेवचा जन्म गरीब कुटुंबात झाला होता. वडील मजूर होते. त्यांच्यावरच पूर्ण साठे कुटुंब चालत होते.  महादेवने सातवी पर्यंतचे शिक्षण व्यवस्थित घेतले.

आठवीला गेल्यावर वह्या पुस्तक नसल्याने शाळेला दांडी मारण्याचे काम सुरू झाले. वाईट संगतीचा हा परिणाम होता. एक दिवस वडिलांना हे कळले तेव्हा त्यांनी महादेवाला खूप मारले, पण त्यानंतर महादेवची शाळाच सुटली.

शाळा सुटल्याने वाईट संगतीचा परिणाम होत गेला आणि महादेव गुन्हागारी क्षेत्राकडे वळला. १९९८ मध्ये महादेवने पहिला गुन्हा केला तो होता चोरीचा. तेव्हापासून गुन्हेगारी सुरूच झाली.

२०१२ पर्यंत चोरी, जबर मारहाण, खुनी हल्ला, दरोडा असे १६ वेगवेगळे गुन्हे महादेवच्या नावावर झाले. अशात  त्याचे लग्न झाले आणि पूर्ण आयुष्यच बदलले. त्याच्या पत्नीने गुन्हेगारी सोडण्यास सांगितले आणि त्याने गुन्हेगारी सोडली.

त्यासाठी त्याने दारूचा व्यवसाय सुरू केला, त्यातून त्याला ५ ते ६ हजार रुपये महिन्याला मिळू लागले. पण तिथेही एक अडचण होती, ती म्हणजे पोलिसांच्या धाडी. तेव्हा पोलिसांनीही दारूचा व्यवसाय बंद करून काहीतरी दुसरा व्यवसाय करण्याचे सांगितले.

आता त्याने पान टपरी सुरू केली आहे. त्यासाठी ५ हजार रुपये टपरीचे आणि ५ हजार रुपये मालाचे असे १० हजार रुपये गुंतवणूक करून त्याने हा पान टपरीचा व्यवसाय सुरू केला आहे.

विषेश म्हणजे पान टपरीचा व्यवसाय वाढण्यास वेळ लागला तरी चालेल पण पुन्हा गुन्हेगारी क्षेत्राकडे वळणार नसल्याचे, महादेवने म्हटले आहे. त्याला दोन मुले असून त्यांना महादेव चांगले शिक्षण देणार असल्याचेही त्याने सांगितले आहे.

असा होता महादेवचा एक गुन्हेगार ते सामान्य नागरिक  प्रवास. पोलिसांनी सुरू केलेल्या गुन्हेगारी रोखण्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचे महादेवाच्या या प्रवासातून दिसून येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.