सांगलीच्या बचत गटाची बिस्किटे महाराष्ट्रातच नाही तर काश्मीर आणि केरलमध्ये पोहचली

0

 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिला बचत गट आहे. त्यातल्या त्यात सातारा सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचत गट आहे. बचत गटातून अनेक महिला यशाचे शिखर गाठत असतात. काही असे मोजकेच गट असतात, ज्यांना महाराष्ट्रातच नाही तर राज्याच्या बाहेर देखील प्रसिद्धी मिळाली आहे.

असाच एक बचत गट इस्लामपूर तालुक्यातील नवेखेड येथील सद्गुरू स्वयंसहाय्यता नावाचा आहे. ज्याने चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. हा बचत गट अंजली दळवी या चालवतात. विविध प्रकारच्या बिस्कीट तयार करून त्या बिस्किटांच्या गुणवत्तेच्या जोरावर अंजली दळवी यांनी आपल्या बचत गटाचे नाव मोठे केले आहे.

अंजली ताई या पहिल्यापासूनच उपक्रमशील होत्या. त्यामुळे अंजली यांनी एक बचतगट स्थापन केला. त्यात मासिक बचत गोळा करणे बँकेत भरणे, महिला सदस्यांना गरजेप्रमाणे जमा रक्कम कर्ज म्हणून वाटणे अशी कामे सुरू झाली. २०१७ साली पंचायत समितीच्या आग्रहावरून त्यांनी गटाची शासकीय नोंदणी केली.

खरं पाहता दळवी कुटुंबाची ४ एकर शेती आहे. अंजली ताई घरकाम आणि शेतकाम असे दोन्ही काम करत होत्या. तेव्हा अंजली ताईंना स्वतः ही काही तरी करावे असे वाटत होते. असे म्हणत त्यांनी सुरुवातीला मसाला व्यवसाय सुरू केला.

गरम मसाला, चिवडा मसाला, मिरची मसाला तसेच चहा मसालाही त्या तयार करू लागल्या. घराजवळून जाणाऱ्या महिलांना थांबवून त्या आपल्या मसाल्याच्या पुड्या त्यांना देत. तसेच गावात हळदीकुंकू असेल तिथे अंजली या आपले मसाल्याच्या छोट्या पुड्या देत.

इस्लामपूरमध्ये भरलेल्या दख्खन यात्रा प्रदर्शनात त्यांनी पहिल्यांदा स्टॉल लावला. यात त्यांच्या मसाल्याची सुमारे ५ हजार रुपयांची विक्री झाली यातून त्यांना एक आत्मविश्वास मिळाला होता. तसेच तिथे लावलेल्या बिस्किटांच्या स्टॉलवर मोठी गर्दी दिसत होती. त्यामुळे त्यांनी होलसेल दरात बिस्किटे आणून आपल्या गावात विकण्यास सुरुवात केली.

ग्रामीण भागात स्वतःच घरगुती मसाला तयार केला जात असल्याने त्यांना मसाल्याची मागणी कमी असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांनी बिस्कीट निर्मीती व्यवसायामध्ये उतरण्याचे ठरवले.

२०१८ मध्ये जवळपास सव्वा लाख रुपये अंजली ताईंनी खर्च केले आणि छोटे पीठ मळणी यंत्र आणि ओव्हन खरेदी केला. तसेच अंजली ताईंनी ९ हजार रुपये भरून इचलकरंजी येथून बिस्किटे आणि बेकरी उत्पादनाच्या निर्मितीची प्रशिक्षणे घेतली.

गहू, नाचणी, बाजरी यांपासून अंजली ताई बिस्किटे बनवतात. त्यात शुगर फ्री, काजू कस्टर्ड, नाईस, नानकटाई, मिल्क इलायची अशा सुमारे १८ प्रकारची बिस्किटे अंजली ताई बनवतात. तसेच ‘समान तुमचे मजुरी आमची’ अशी संकल्पनाही त्यांनी राबवली आहे. त्यासाठी त्या ७० रुपये मजुरी घेऊन बिस्किटे तयार करून देतात. तसेच सामानशिवाय १६० रुपये प्रमाणे ते बिस्किटांची विक्री करतात.

तसेच आता गावातील अन्य महिलाही अंजली ताईंच्या संपर्कात आल्या आहेत. अंजली ताई नेहमीच महिलांना प्रोत्साहित करत असतात. त्यामुळे आता अनेक महिलांनी छोटे मोठे व्यवसाय देखील सुरू केले आहे.

आपल्या बिस्किट उत्पादनात उत्तम दर्जा आणि गुणवत्ता दिल्याने त्यांच्या बिस्किटांना चांगली ओळख मिळाली आहे. इतकेच काय तर परराज्यात म्हणजेच केरळ आणि काश्मीरमध्येही त्यांची ही बिस्किटे लोक आवडीने खातात.

सद्गुरू महिला बचत गटाला आणि अंजली दळवी यांना डीआरडीए मार्फत जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे. अंजली यांना हिरकणी, नवउद्योजक महाराष्ट्राचे असे पुरस्कारदेखील मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.