कधीकाळी डोक्यावर भाजी घेऊन विकणारा सोलापूरचा ‘हा’ पठ्ठ्या UPSC परीक्षेत आला देशात आठवा

0

 

 

प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे येत असतात, पण जर माणूस जिद्दीने आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असेल तर एक दिवस त्याला यश नक्कीच मिळते. आजची ही गोष्ट पण अशाच एका तरुणाची आहे.

आई वडीलांची मदत करण्यासाठी डोक्यावर भाजी घेऊन विकणारा शरण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात आठवा आला आहे. आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर माणूस काहीही करु शकतो, हे शरणने दाखवून दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्याच्या तळवडे गावात राहणाऱ्या या तरुणाचे पुर्ण नाव शरण गोपीनाथ कांबळे असे आहे. शरणने २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय लेकसेवा आयोगाच्या सीएपीएस असिस्टंट कमांडंट (ग्रृप ए) परीक्षेत देशात आठवा क्रमांक पटकावला आहे.

त्याचे वडील गोपीनाथ कांबळे हे शेतकरी आहे, त्यांची दीड एकर शेती आहे. आपल्या परिस्थितीची जाणीव शरणला आधीपासूनच होती, त्यामुळे तो वडिलांसोबत डोक्यावर भाजी घेऊन विकायला जायचा.

गोपीनाथ यांचे दोन मुले आहे, त्यांचा मोठा मुलगा दादासाहेब इंजिनियर आहे. तर शरणने इंजिनियरींगची पदवी घेतल्यानंतर त्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरु केला होता.

त्याचे प्राथमिक शिक्षण तळवडेच्या यशवंतराव चव्हाण शाळेत झाले होते, तर बारावीचे शिक्षण त्याने वैरागच्या विद्यामंदीर महाविद्यालयात घेतले होते. २०१६ साली त्याने बी टेक पुर्ण केले होते, त्यानंतर त्याने इंडियन इन्स्टिट्युट ऑफ सायन्स बँगलोर येथून मास्टर ऑफ टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतले होते.

शिक्षणानंतर त्याला २० लाखांचे पॅकेज देणाऱ्या एका कंपनीची नोकरीसाठी ऑफर आली होती. पण आई वडीलांनी त्याच्यासाठी घेतलेली मेहनत पाहून त्याने ती नोकरी नाकारली आणि स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. तो दिवसातून १८ ते २० तास अभ्यास करायचा. त्याच्या अथक मेहतीमुळेच त्याला हि परीक्षा पास करता आली आहे.

स्पर्धा परीक्षेत शरण देशात आठवा आल्याने पुर्ण राज्यात त्याचीच चर्चा सुरु आहे. गावकऱ्यांनी तर फटाक्यांची आतिषबाजी केली असून सगळीकडून त्याचे कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.