कौतुकास्पद! लॉकडाऊन काळात अभ्यास केला सुरू आणि झाली सीए; वाचा गृहिणीची कहाणी

0

 

 

अनेकदा गृहिणीला घर सांभाळण्यासोबत नोकरीही करावी लागते, त्यामुळे गृहिणीला दोघांमध्ये समतोल राखण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. त्यात एक आई असेल तर मुलांना सांभाळण्याचे कामही तिच्यावरच असते.

अशात जर कुटुंबाने तिला साथ दिली तर ती काहीही करू शकते, असेच एक उदाहरण आता समोर आले आहे. पुण्यातील अरुणा कुंभार-शिरसे या महिलेने चक्क नोकरी सांभाळत सीएची परीक्षा पास केली आहे.

अरुणा या पुण्यातील पिंपळे-निखल या परिसरात राहतात. अरुणाने एकत्र कुटुंबाच्या पाठिंब्याने सीएची परीक्षा पास केली आहे. त्या गेल्या ११ वर्षांपासून व्यवस्थापक म्हणून खाजगी कंपन्यांमध्ये नोकरी करत होत्या.

पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर अरुणा यांना सीए बनण्याची इच्छा झाली होती. लग्नानंतर त्यांना आपण सीए होऊ का? असा प्रश्न त्यांना होता पण लग्न झाल्यानंतर त्यांच्या पतीनेच अरुणा यांना त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यास साथ दिली आहे.

अरुणा यांचे पती अविनाश यांच्यासोबतच सासू-सासरे, दीर-जाऊ सर्वांनी तिला परिक्षेसाठी अभ्यास  करण्याचे सांगितले, तसेच त्यांनी अरुणाला पाठिंबाही दिला. विशेष म्हणजे सहा वेळा अपयश आल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही आणि त्यानंतरच्या प्रयत्नात त्यांना हे यश मिळाले आहे.

अरुणा सकाळी नऊ ते रात्री सात वाजेपर्यंत नोकरी करायच्या. पण त्यांच्या कुटूंबाने त्यांना नोकरी सोडून सीएच्या परिक्षेसाठी तयारी करण्याबाबत सांगितले. असे असले तरी त्या एक आई होत्या, त्यामुळे मुलांच्या शाळेचे बघणे, त्यांना डबा भरुन देणे याचीही जबाबदारी त्यांच्यावर होती.

अरुणा यांना आपले स्वप्न पुर्ण करायचे होते, पण अभ्यासाला वेळ मिळत नव्हता. अशात देशात लॉकडाऊन लागले, त्यामुळे अरुणा यांना या लॉकडाऊनचा पुर्ण फायदा झाला. कारण त्यांना आता अभ्यासासाठी वेळ मिळत होता.

त्यांनी नियोजन पद्धतीने अभ्यास करण्यास सुरुवात केली. तसेच तिच्या कुटूंबानेही तिला शक्य ती मदत केली. तसेच अरुणा यांनी ऑनलाईन उपलब्ध असणाऱ्या मोफत तासिकांचा भरपुर वापर केला. त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्हॉईस नोट्स सुद्धा तयार केल्या. अशाप्रकारच्या ट्रिक्स त्यांनी अभ्यास करण्यासाठी वापरल्या आणि अखेर त्यांच्या मेहनतीला यश आले आहे.

आपल्या ध्येयावर पुर्णपणे लक्ष केंद्रीत करुन जर मेहनत घेतली आणि त्यात कुटूंबाची जर आपल्याला साथ असेल तर आपण लवकरच आपले ध्येय गाठू शकतो, असे अरुणा यांनी म्हटले आहे. सीएची परिक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आता त्यांच्यावरची जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.