तेव्हा ‘पॅराशूट’ला आपला खप वाढवण्यासाठी लढावे लागले होते उंदरांसोबत…

0

 

आज पॅराशूट या ब्रॅण्डने देशभरात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. खोबऱ्याचे तेल म्हटले की पॅराशूट आठवते. पॅराशूटच्या सुगंधाने आणि गुणवत्तेने अनेकांना भुरळ घातली आहे. पण तुम्हाला माहितीये का एकेकाळी पॅराशूटची एक बाटली विकणेही कठीण झाले होते.

मारीवाला कुटुंबाने १९४७ मध्ये बॉम्बे ऑइल इंडस्ट्रीची सुरुवात केली होती. १९७० पर्यंत कंपनी व्यवस्थित चालत होती. तसेच कंपनी चार युनिटमध्ये माल बनवत होती. कंपनीत सेव्हरी प्लांटच्या खोबऱ्याच्या साहाय्याने खोबऱ्याचे तेल तयार केले जात होते.

त्यावेळी कंपनीने पॅराशूट आणि सफोला प्रॉडक्ट लाँच केले होते. प्रॉडक्ट लाँच करण्यात आले, तेव्हा हर्ष मारीवाला यांनी कंपनीला नुकतेच जॉईन केले होते. त्यावेळी पॅराशूटची पॅकिंग मोठ्या बॉटलमध्ये केली जात होती.

हर्ष यांना असे कळले होते की कोलकताची शालीमार नावाची कंपनी खोबऱ्याचे तेल एका छोट्या पॅकेटमधून विकत आहे. त्यामुळे सामान्यांना ते परवडत आहे. तसेच शालीमार कंपनीला यातून नफा देखील मिळत आहे. हे पाहून हर्ष यांनी तिथल्या मार्केटला भेट देण्याचे ठरवले.

हर्ष मारीवाला तिथे गेले, तेव्हा त्यांना असे लक्षात आले की पॅराशूटला देखील बाजारात चांगली मागणी आहे. मात्र पॅराशूटचे मोठे पॅकेट हे सामान्य माणसाला परवडेल असे नव्हते. त्यामुळे हर्ष यांनी पॅराशूटचे छोटे पॅकेट बनवण्याचे ठरवले. तसेच जास्तीत जास्त सामान्य माणसांपर्यंत हे पोहचायला हवे, यासाठी ते प्रयत्न करू लागले होते.

तसेच हर्ष आणि त्यांच्या टीमने पॅराशूट खोबऱ्याच्या तेलाच्या प्लॅस्टिकच्या छोट्या आणि आकर्षक बाटल्या तयार केल्या. त्यावेळी एक सर्व्हे करण्यात आला, त्यात असे लक्षात आले की, बाजारात व्यापारी प्लास्टिकच्या बाटल्या घेण्यास तयार नाही.

अनेक व्यापाऱ्यांनी तर प्लास्टिकच्या बाटल्या दुकानात ठेवणेच बंद केले होते. याचे कारण होते उंदीर. हर्ष यांना असे कळले की कोकोनट ऑइल ६० च्या दशकात प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये पॅक केले जात होते. मात्र उंदीर त्यांना कुरतडत होते, त्यामुळे व्यापाऱ्यांना खूप नुकसान व्हायचे.

बाजारातील व्यापारी पुन्हा ही चुकी होऊ देणार नव्हते. त्यामुळे हर्ष यांनी उंदीर या बाटल्या कशा कुरतडत आहे, हे समजून घेण्यासाठी उंदरांचे निरीक्षण केले. तेव्हा हर्ष यांच्या असे लक्षात आले की, बाटल्या चौकोन असल्याने उंदरांना कुरतडने शक्य होत होते. त्यामुळे हर्ष यांनी पॅराशूटच्या बाटल्या गोल बनवण्याचे ठरवले.

बाटल्या गोल असल्याने उंदरांना बाटल्या पकडणे शक्य होणार नव्हते. तसेच या बाटल्या लीक प्रूफ देखील बनवण्यात आल्या. एवढे करून या बाटल्या व्यापाऱ्यांना दाखवण्यात आल्या. मात्र व्यापाऱ्यांनी पॅराशूटच्या बाटल्यांना नकार दिला.

पॅराशूटच्या तयार केलेल्या बाटल्या सुरक्षित आहे, हे व्यापाऱ्यांना पटवून देण्यासाठी हर्ष आणि त्यांच्या टीमने एक प्रयोग करण्याचे ठरवले. त्यांनी एका उंदरांच्या पिंजऱ्यात ही गोल बाटली ठेवली. दोन दिवसानंतर देखील बाटली सुरक्षित होती. हे सगळे हर्ष आणि त्यांच्या टीमने कॅमेरात रेकॉर्ड करून ठेवले होते.

कॅमेरात केलेली रेकॉर्डिंग सेल्स टीमने व्यापाऱ्यांना दाखवली. त्यानंतर सर्व व्यापारी पॅराशूटच्या बाटल्या घेण्यास तयार झाले. अशा प्रकारे उंदरांच्या समस्येवर मात करत हर्ष यांनी पॅराशूटच्या छोट्या बाटल्या सामन्यांपर्यंत पोहचवल्या. त्यामुळे पॅराशूटला आणखी लोकप्रियता मिळाली.

१९९० मध्ये बॉम्बे ऑइल कंज्युमर प्रॉडक्ट्स डिव्हिजन ‘मेरिको लिमिटेड’ बनले. मेरिको कंपनीने पुढे भारतातल्या टॉप १० कंपनीमध्ये स्वतःची जागा बनवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.