ज्याला शिवसेनेने संभेत गोंधळ केला म्हणून हाकलून लावले तो झाला राष्ट्रवादीचा आमदार

0

महाराष्ट्रात कुठलाही राजकीय वारसा नसताना राजकारणात यश मिळवलेले अनेक नेते आपल्याला पाहायला मिळतील. त्यातीलच एक आमदार म्हणजे निलेश लंके. निलेश लंके २०१९ ला निवडून आले आणि आमदार बनले.

राष्ट्रवादीकडून त्यांना तिकीट मिळाले होते. १० मार्च १९८० रोजी त्यांचा जन्म पारनेर तालुक्यातील हंगा या गावात झाला होता. निलेश लंके यांचे वडिल के जिल्हापरिषद शाळेत शिक्षक होते आणि त्यांची आई शकुंतला या गृहिणी होत्या.

निलेश यांना लहानपणीपासूनच कुस्तीचे वेड होते त्यामुळे त्यांना गावात पैलवान म्हणून ओळखत असत. शाळेत असताना त्यांना सामाजिक कामांचीही आवड होती. २००५ साली त्यांनी पहिल्यांदा ग्रामपंचायत निवडणूक लढवली.

त्यावेळी त्यांना घरातूनच विरोध झाला होता. कॉलेजचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर त्यांनी ही निवडणूक लढवली होती. निलेश लंके यांनी फिटर ग्रेडमध्ये नगरला आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. त्यावेळी त्यांनी सुपा एमआयडीसीमधील एका कंपनीत खुप वेळा मुलाखत दिली पण त्यांचे काम झाले नाही.

त्यावेळी त्यांना त्यांच्या मित्राने सांगितले की येथे आमदाराच्या चिट्ठीशिवाय काम मिळत नाही. त्यावेळी ते अनेकांकडे चिट्ठीसाठी फिरले पण त्यांच्या हाती निराशाच आली. पुढे त्यांना नगरमधील कायनेटिक कंपनीत काम मिळाले.

पण त्यांना गावातील राजकारणात रस होता त्यामुळे त्यांचा ही नोकरीही सुटली. त्यानंतर खर्च दाखवण्यासाठी त्यांनी हंगा स्टॅण्डवर एक छोटे चहाचे दुकान सुरू केले. पण दुकान चालू केल्यानंतर त्यांचे चहाचे पैसैदेखील वसूल झाले नाहीत आणि त्यांच्या स्वभावामुळे त्यांना धंद्यात यश आले नाही.

२००७ मध्ये त्यांनी शिवसेनेकडून पंचायत समितीची निवडणूक लढवली पण अगदी काही मतांनी ते हारले. खिशात एकही रूपया नसताना त्यांनी ही निवडणूक लढवली होती. या निवडणूकीनंतर गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास बसला.

मग २०१० मध्ये ते गावचे सरपंच झाले. पण त्यांनी एक वर्ष गावाचा कायापालट करून हे पद सोडलं. त्यानंतर ते शिवसेनेचे तालुका प्रमुख बनले. नंतर २०१२ ला त्यांची पत्नी पंचायत समिती सदस्य आणि २०१७ ला जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आली.

शिवसेनेत त्यांची ओळख निर्माण झालेली असताना २०१८ मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे पारनेर येथे आले होते तेव्हा त्यांच्या सभेत गोंधळ घातला असा आरोप त्यांच्यावर झाला. त्यामुळे त्यांची शिवसेनेतून हाकलपट्टी करण्यात आली होती. पण सामान्य जनता पाठीमागे उभे राहिल्याने निलेश लंके यांना प्रेरणा मिळाली.

त्यानंतर त्यांनी निलेश लंके प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजकार्याला सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादीने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले. २४ ऑक्टोबर २०१९ ला निलेश लंके ६१ हजार मतांनी निवडून आले आणि आमदार झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.