बिहारचा नवीन माऊंटेन मॅन ज्याने ३० वर्षे फोडले डोंगर आणि तयार केला गावासाठी कालवा

0

 

डोंगर फोडून रस्ता तयार करणाऱ्या माऊंटेन मॅन बद्दल सगळ्यांचा माहित आहे. आता बिहारच्या आणखी एका माऊंटेन मॅनची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. या नवीन माऊंटेन मॅनने डोंगर फोडून तीन किलोमीटर लांब असा कालवा तयार केला आहे. लौंगी भुईया असे या कालवा तयार केलेल्या माणसाचे नाव आहे.

लौंगी भुईया यांना हा कालवा बनवण्यासाठी ३० वर्षे लागली.  ३० वर्षांपासून ते एकटेच डोंगर तोडत होते. त्यांनी बनवलेल्या या कालव्यामुळे आता पूर्ण गावाला पाणी मिळत आहे.

या गावात पाण्याच्या टंचाईमुळे सगळे लोक मक्क्याची शेती करत होते. त्यामुळे दुसरा काही कामाचा पर्याय नसल्याने आणि गावातही काम मिळत नसल्याने अनेक तरुण शहराकडे स्थलांतरित होत होते. मात्र ते सगळं लौंगी यांना आवडत नव्हते.

त्यामुळे त्यांनी गावात आणि गावातल्या शेतात पाणी आणायचे ठरवले. त्यासाठी ते रोज कालवा बनवण्यासाठी एकटेच डोंगर तोडायला जायचे. त्यांना कोणीही या कामाचे पैसे देत नव्हते. त्यामुळे लौंगी यांच्या या कामाला कुटुंबाने विरोध केला होता.

एक दिवस मी बकऱ्यांना चारा खाऊ घालण्यासाठी नेत होतो, तेव्हा माझ्या असे लक्षात आले की, जर आपण गावात पाणी आणले तर  इथले तरुण गाव सोडून निघून नाही जाणार, तेव्हाच मी गावात पाणी आणायचे ठरवले, असे लौंगी म्हणतात.

लौंगी यांच्या या कामामुळे आता लोकांना त्यांच्या शेतात  वेगवेगळी पिके लावता येत आहे. तसेच या कालव्यासोबत गावामध्ये एक मोठा तलाव तयार झाला आहे. तिथल्या तीन गावातील ३००० लोकांना या कालव्याचा फायदा होत आहे.

बंगेठा नावाच्या एका डोंगरामुळे पावसाचे पाणी या गावात येण्यात अडचण येत होती. ते पाणी गावात आणण्यासाठी लौंगी यांनी एक नकाशा तयार केला. या नकाशानुसार ते ३० वर्षांपासून कालवा तयार करण्याचे काम करत होते. पाच फूट लांब आणि ३ फूट खोल असा कालवा त्यांनी तयार केला आहे.

लौंगी यांचे पूर्ण गावाकडून कौतुक केले जात आहे. तसेच जर मला सरकार ट्रॅक्टर देत असेल तर नापीक जमिनीवर काम करून  ती चांगली बनवण्याचे काम मी करू शकतो, असे लौंगी यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.