भारतनाना: ज्याला न्यायला साक्षात मुख्यमंत्र्याने हेलिकाॅप्टर पाठवलं होता असा एकमेव आमदार

0

 

पंढरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे आज निधन झाले आहे. कोरोनामधून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्रास सुरू झाला होता. पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांचे उपचार सुरू होते, मात्र अखेर रात्री साडेबाराच्या सुमारात त्यांची प्राणज्योत मावळली आहे. भारत भालके ६० वर्षांचे होते.

भारत भालके हे पंढरपूरचे आमदार होते. भालके पश्चिम महाराष्ट्रातील लोकांशी जोडले गेलेल्या नेत्यांपैकी एक नेते होते. त्यांनी आपल्या जनसंपर्काच्या बळावरच विधिमंडळाच्या सदस्यत्वाची हॅट्रिक मारली होती.

११९२ मध्ये ते राजकारणात सक्रिय झाले होते. २००२ पासून ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन म्हणून काम पाहत होते. तेव्हा पासून आजपर्यंत या कारखान्यावर त्यांचेच वर्चस्व राहिलेलं आहे.

भारत भालके हे तिसऱ्यांदा विधानसभा निवडणुकीत जिंकून आमदार झाले आहे, त्यामुळे त्यांना हॅट्रिक आमदार म्हटले जाते.  विशेष म्हणजे ते तीन वेळा तीन वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढले होते.

२००४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, मात्र पुढे ते सलग निवणूक जिंकत गेले. २००९ मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदार संघातून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी काँग्रेस नेते आणि तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाळकेंना मुंबईला नेण्यासाठी खास हेलिकॉप्टर पाठवले होते.

पुढे २०१४ च्या निवडणूकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला विजय मिळवून दिला. तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा हातात घेत विजय मिळवला.

साधारणता २५ वर्षांपूर्वी सुधाकर परिचारकांनी शरद पवारांच्या उमेदवाराला पंढरपूरातून पराभूत केलं अन शड्डू ठोकून पवारांना सांगितलं ‘तुमच्या उमेदवाराला पाडून आलोय..’

तेव्हा २५ वर्षानंतर त्याच शरद पवारांच्या शिष्याने म्हणजेच भारत भालके  यांनी २०१९ ला परिचारकांना आस्मान दाखवले अन पंढपुरात भर चौकात शड्डू ठोकुन सांगितलं, “शरद पवारांचा पठ्या विजयी झालाय..”

भारत भालके यांनी २०१९ मध्ये काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा होत्या. आषाढी एकादशीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भालके यांच्या घरी फराळाचा आस्वाद घेतला होता, त्यामुळे चर्चांना चांगलेच उधाण आले होते.

मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत त्यांनी या चर्चांवर पूर्ण विराम लावला होता. भालके यांच्या निधनाने राजकिय वर्तुळात शोककळा पसरली आहे. अनेक राजकीय नेत्यांनी भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

जनसामान्यांचा नेता म्हणून भारत भालके यांची ओळख होती. ते  एक जमिनीशी जुळलेले नेते होते. आता भालके यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी तीन विवाहित मुली आणि एक मुलगा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.