प्रेरणादायी! शहरातील नोकरी सोडून गावाकडे आला, स्ट्रॉबेरीची शेती करून दोन महिन्यांत कमावले २ लाख

0

आधुनिक काळात शेतकरी पांरपारिक शेती सोडून नवीन नवीन प्रयोग करून बक्कळ पैसा कमवत आहेत. तरूणाईही आता शेतीकडे वळू लागली आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच एका तरूणाची यशोगाथा सांगणार आहोत.

गुजरातच्या जामनगर जिल्ह्याच्या आनंद गावचा रहिवासी असलेला विशाल जसदिया असे त्या तरूणाचे नाव आहे. विशाल आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुटची शेती करतात. त्यांच्याकडे सध्या ११ एकर जमीन आहे.

त्यातून ते दरवर्षी ४० लाख रूपयांची कमाई करत आहेत. त्यांनी नोकरी सोडून शेतीला सुरूवात केली होती. ते याआधी कोरोमंडल इंटरनॅशनल या कंपनीत कामाला होते. तीन वर्षे त्यांनी तेथे काम केले. मग त्यांना वाटले की शहरात काम करण्यापेक्षा गावाकडे जाऊन शेती केलेली काय वाईट आहे का?

२०१९ मध्ये त्यांनी नोकरी सोडली आणि शेती करण्याचा निर्णय घेतला. ते म्हणाले की आमच्या गावात आधी पारंपारिक शेती केली जायची. या शेतीमध्ये जेवढा खर्च व्हायचा तेवढा फायदा होत नव्हता.

त्यानंतर त्यांना स्ट्रॉबेरीच्या शेतीबाबत माहिती मिळाली. त्यांच्या काही मित्रांनी त्यांना सांगितले की त्यांना स्ट्रॉबेरीची शेती केली पाहिजे. त्यामध्ये वेळ कमी लागतो आणि फायदाही जास्त होतो. मग विशाल यांनी हिमाचल प्रदेशमध्ये जाऊन स्ट्रॉबेरीच्या शेतीबद्दल माहिती मिळवली.

तेथे ते काही शेतकऱ्यांना भेटले. पहिल्यांदा त्यांना वाटले की राजस्थानचे वातावरण बघता तेथे स्ट्रॉबेरीची शेती करता येणार नाही. पण नंतर त्यांना कळले की स्ट्रॉबेरीचे काही असेही प्रकार आहेत ज्यांची शेती गुजरातमध्येही होऊ शकते.

२०१९ मध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची ६ हजार रोपटे लावली. त्यातून त्यांना ३००० किलोपेक्षा जास्त स्ट्रॉबेरीचे उत्पादन मिळाले. ही स्ट्रॉबेरी त्यांनी राजकोटमध्ये विकली. पहिल्याच वेळेस त्यांना स्ट्रॉबेरीतून २ लाखांचे उत्पादन मिळाले होते.

त्यानंतर त्यांनी शेती वाढवली. स्ट्रॉबेरीबरोबर त्यांनी ड्रॅगन फ्रुटची आणि भाज्यांची शेती करण्यास सुरूवात केली. आता सध्या ते ११ एकरात शेती करत आहेत. त्यांच्या एका एकरातील स्ट्रॉबेरीतून त्यांना ३ लाखांचे उत्पन्न मिळण्याची आशा आहे. जर पिक चांगले आले तर ६ ते ७ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.