स्कुलबसला रुग्णवाहिकेत बदलून पाच महिन्यापासून कोरोना रुग्णांना सेवा देतेय ‘ही’ महिला

0

 

कोरोनाच्या संकट काळात कोरोना योद्धे न थांबता दिवसरात्र लोकांची मदत करत आहे. अशात सामान्य लोकदेखील कोरोना रुग्णांच्या मदतीला धावून येताना दिसत आहे. मुंबईच्या एका महिलेने तर चक्क स्कुलबसला कोविड रुग्णवाहिका बनवलीये.

मुंबईच्या नीलम सिंग गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना रुग्णांची मदत करत आहे. नीलम स्कुलबस चालवतात. मात्र कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे त्यांनी स्कुलबसचे रूपांतर रुग्णवाहिकेत केले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये सर्व काही बंद होते. अशा वातावरणात स्कुलबसदेखील बंदच होत्या. त्यामुळे स्कुलबसचे रूपांतर रुग्णवाहिकेत करा, असे आदेश नीलम यांना शाळेकडून मिळाले.

गेल्या पाच महिन्यापासून नीलम रुग्णवाहिका चालवण्याचे काम करत आहे. कोरोना रुग्णांशी संपर्क आल्याने त्यांच्यासोबत नीलम यांच्या आईला आणि नवऱ्याला देखील कोरोना झाला होता. पुढे उपचारानंतर जेव्हा त्या निगेटीव्ह आल्या त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून नीलम यांनी पुन्हा हे काम सुरू केले.

आतापर्यंत नीलम सिंग यांनी ३ ते ४ हजार संक्रमित लोकांना रुग्णालयात पोहोचवले आहे. सुरुवातीला घरच्यांनी नीलम यांना हे काम करण्यास नकार दिला होता, मात्र आता त्यांच्या कुटुंबानेही लोकांच्या सेवेसाठी पाठिंबा दिला आहे.

अनेकवेळा रुग्णांचे नातेवाईक रुग्णांसोबत येत नाही. तेव्हा नीलमच त्या रुग्णांना रुग्णालयात घेऊन जातात, त्यांचे रजिस्ट्रेशन करतात. तसेच रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्याचे काम नीलम करत असतात.

माझ्या कामामुळे माझे कौतुक केले जात आहे, लोकांचे आशीर्वाद मला मिळत आहे. जेव्हा रुग्णांची सेवा मला करायला भेटते, तेव्हा एक समाधान मिळते, असे नीलम यांनी म्हटले आहे.

तसेच कोरोना तर राहणारच आहे. मात्र आपल्या कुटुंबाला चालवण्यासाठी आपल्यालाच बाहेर पडावे लागणार आहे. प्रत्येकाने आपली काळजी घ्यायला पाहिजे. सोशल डिस्टनसिंगचे पालन केले पाहिजे, मास्क लावायला पाहिजे, असे नीलम यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.