मेंढरं राखताना जे स्वप्न पाहिलं होतं ते खरं झालं, आयईएस परीक्षा पास करून झाला सायंटीफीक ऑफिसर

0

आज आम्ही अशा एका मुलाची यशोगाथा सांगणार आहोत ज्याने आयईएस परिक्षेत २१ वा रॅंक पटकावला आहे. लोटेवाडी येथील रहिवासी असलेले आबा लवटे यांनी पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण तर घेतले पण त्याचबरोबर त्यांनी आपला पारंपारीक व्यवसायही चालू ठेवला तो म्हणजे मेंढरं राखण्याचा.

त्यामुळे त्यांना शिक्षणात जास्त रस नव्हता. त्यांचे १ ली ते ४ थी पर्यंतचे शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतच झाले होते. आई वडील ऊसतोडीचे कामही करायला जायचे. लोक त्यांना प्रेमाने आबा म्हणायचे.

आबाला आपल्या आई वडीलांसोबत ६ महिने उस तोडायला जावे लागायचे. उरलेल्या वेळेत ते शाळा शिकायची आणि अभ्यास करायचा असा त्यांचा प्रवास होता. त्यांचे ५ वी ते १० वीचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल लोटेवाडी येथे झाले होते.

१० वीच्या परीक्षेत त्यांना ७३.५३ टक्के गुण मिळाले होते. ११ वीला त्यांनी आबासाहेब खेबुडकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयात येण्या जाण्यासाठी त्यांना खुप संघर्ष करावा लागत होता.

त्यांना महाविद्यालयात येण्याजाण्यासाठी दररोज लोटेवाडी ते आटपाडी असा १२ किलोमीटरचा प्रवास सायकलवरून करावा लागत होता. त्यावेळी ट्युशन अभावी आबा ११ वी सायन्सला गणित या विषयात नापास झाले.

त्यानंतर त्यांनी ट्युशनशिवाय अभ्यास करत १२ वी सायन्सला ७१ टक्के गुण मिळवले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. या मार्कांच्या जोरावर त्यांनी बी. ई. साठी आण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, आष्टा या कॉलेजला प्रवेश घेतला आणि तेथे त्यांनी बी. ईची पदवी घेतली.

त्यानंतर त्यांना माहिती मिळाली की इंजिनिअरींगमधील सर्वात मोठी पोस्ट म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्विसेस (आयईएस) परीक्षा उत्तीर्ण झाल्यास अभियांत्रिकी विभागाशी संबंधित अनेक खात्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळते.

त्यांनी ठरवले की आपण हीच परीक्षा पास करायची. २०१६ ला त्यांनी पहिल्यांदा ही परीक्षा दिली. मात्र ते नापास झाले. यानंतर २०१९ मध्ये आबांनी पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरूवात केली. विविध खात्यांच्या परीक्षा दिल्या.

तसेच गेटची परीक्षा त्यांनी तब्बल सातवेळा पास केली. इतकेच नाही तर युजीसीची नेट परीक्षाही त्यांनी पास केली. २०१९ ला त्यांनी आयईएसची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तयारी केली पण दुर्देवाने ते पुन्हा पुर्वपरीक्षेत नापास झाले.

त्यानंतर २०१९ ला त्यांनी गेट परीक्षेत ८१.३३ टक्के गुण मिळवले. २०१९ ला आयईएसच्या पुर्व परीक्षेचा त्यांनी प्रचंड अभ्यास केला त्यामुळे २०२० ची आयईएसची पुर्व परीक्षा ते पास झाले. पण पुन्हा कोरोनामुळे लॉकडाऊन झाले आणि परीक्षेची तारीख रखडण्यात आली.

२०२० ला त्यांनी घरीच पुढील परीक्षेचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर २०२० मध्ये भाभा अनुसंशोधन केंद्र येथे त्यांची मुलाखत झाली आणि सायंटिफिक ऑफिसर म्हणून महाराष्ट्रातून एकट्या आबांची निवड झाली.

५ जानेवारीला निकाल लागला आणि १७ जानेवारी २०२१ ला जॉयनिंग झाले. आता त्यांना कसलीही अडचण नव्हती. मार्च २०२१ ला त्यांचा रखडलेला आयईएसची मुलाखत होणार होती त्यासाठी त्यांना दिल्लीला जावे लागणार होते.

यानिमित्ताने ते पहिल्यांदा दिल्लीला गेले व मुलाखत पार पडली. मुलाखतीतही ते पास झाले आणि १२ एप्रिल २०२१ ला आयईएसचा निकाल लागला. तिथेही आबा लवटे यांनी देशात २१ वा क्रमांक पटकावला होता.

लहानपणी जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरले होते. आबांना विश्वासच बसत नव्हता. त्यांनी आई वडीलांचे आणि आपल्या गावाचे नाव मोठे केले होते. पुर्ण गावाने त्यांना डोक्यावर घेतले होते. तुम्हाला हा लेख आवडला असेल तर पुढे पाठवा.

Leave A Reply

Your email address will not be published.