तीन महिन्यात ७६ बेपत्ता मुलांना शोधून ‘अशी’ बनली हेड कॉन्स्टेबलची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

0

 

‘कर भला तो हो भला’ अशी एक म्हण हिंदीत आहे. म्हणजे तुम्ही जर कोणाचे चांगले केले तर तुमचेही चांगलेच होणार. असेच काहीसे झाले आहे दिल्लीतील महिला हेड कॉन्स्टेबल सीमा ढाका यांच्यासोबत.

सीमा यांनी गेल्या तीन महिन्यात ७६ बेपत्ता मुलांना शोधले आहे. त्यामुळे सीमा यांना आऊट ऑफ प्रमोशन देण्यात आले आहे. या प्रमोशनमुळे त्यांची नियुक्ती थेट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर करण्यात आलेली आहे.

दिल्लीमध्ये अनेक दिवसांपासून लहान मुले बेपत्ता होऊ लागली आहे. दिल्लीतील बेपत्ता मुलांच्या वाढत्या तक्रारींमुळे यावर्षी पोलीस कमिशनर एस. एन. श्रीवास्तव यांनी बेपत्ता मुलांना शोधून काढण्यासाठी एक नव्या इन्सेंटिव स्कीमची घोषणा केली होती.

या स्कीमचा उद्देश पोलीस कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे होता. सीमा यांनी गेल्या तीन महिन्यात ७६ मुलांना शोधून काढले आहे. त्यामुळे या चांगल्या कामासाठी इन्सेंटिव स्कीम अंतर्गतच सीमा यांचे प्रमोशन करण्यात आले असू त्यांची नियुक्ती सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी करण्यात आली आहे. अशा प्रकारे प्रमोशन मिळवलेल्या त्या पहिल्या पोलीस कर्मचारी बनल्या आहे.

सीमा या उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्याच्या राहणाऱ्या आहे. कुटुंबातील सदस्य शिक्षण क्षेत्रात असल्याने सीमा यांनाही शिक्षक बनायचे होते.  त्यासाठी त्यांनी तयारीही केली होती. मात्र  पुढे दिल्ली पोलीस कर्मचाऱ्यांचा फॉर्म भरल्याने त्यांची २००६ साली दिल्ली पोलीसमध्ये निवड झाली.

सीमा यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. त्यासाठी सीमा घरापासून ६ किलोमीटर लांब असलेल्या कॉलेजला सायकलने यायची जायची. सीमाचे लग्न झालेले असून सीमाचे पती पण पोलीस कर्मचारी आहे. तसेच सीमाला ८ वर्षांचा मुलगा आहे.

बेपत्ता मुलांना त्यांच्या कुटुंबांना पुन्हा मिळवून दिल्याने एक वेगळाच आनंद मिळतो. आपल्या मुलांना परत मिळवल्याने आई वडिलांच्या चेहऱ्यावर खूप समाधान बघायला मिळते, असे सीमा यांनी म्हटले आहे.

सीमा यांनी शोधलेल्या ७६ मुलांमध्ये ५६ मुलांचे वय १४ वर्षांपेक्षा कमी आहे. सीमा यांच्या या कामाची जोरदार चर्चा सुरू आहे. तसेच सीमा यांना मिळालेल्या अशा अचानक प्रमोशनमुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सीमा यांना मिळालेले हे यश पोलिसांना आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देते आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.