शिवाजी महाराजांना आदर्श मानत ‘या’ माणसाने केली अपंगत्वावर मात अन उभा केला स्वतःचा व्यवसाय

0

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले होते, हे अनेकांना माहिती आहे. पण आपणही असे काही करून दाखवू अशी जिद्द बाळगणारे मोजकेच काही असतात. त्यातलेच एक आहे जुन्नरमधले उत्तमराव डुकरे.

उत्तमराव यांचे नाव जुन्नर परिसरात आदराने घेतले जाते. तसेच तरुण शेतकऱ्यांच्या मनात त्यांच्याबद्दल विशेष प्रेम आहे. उत्तमराव यांची उंची ही पाच फूट असली तरी त्यांनी कुक्कुटपालन व्यवसायात स्वतःचे अग्रगण्य स्थान निर्माण केले आहे.

उत्तमरावांच्या मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे.उत्तमरावांना हे यश मिळवण्यासाठी खूप अडचणी आल्या होत्या त्यांच्यावर मात करत, त्यांनी ही यशाची उंची गाठली आहे. तसेच उत्तमरावांना आता जे काही यश मिळाले आहे, त्या यशाचे सर्व श्रेय उत्तमराव छत्रपती शिवाजी महाराजांना देतात.

उत्तमरावांचे आयुष्य वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत ठीक होते. मात्र एकदा लाकडाचा ओंडका त्यांच्या पायावर पडला. त्यामुळे त्यांच्या गंभीर पायावर जखम झाली होती. गंभीर जखमेमुळे त्यांच्यावर गावात उपचार केले मात्र ती जखम भरत नव्हती.

उत्तमरावांना शहराकडे उपचारासाठी नेण्यात आले, तो पर्यंत निम्म्या पायात पु झालेला होता. तेव्हा शहरातल्या डॉक्टरांनी उत्तमरावांचा पाय कापावा लागेल असे सांगितले. तेव्हा पाय तर कापण्यात आला पण तिथूनच उत्तमरावांचा कठीण संघर्ष सुरू झाला.

पुढे त्यांना आयुष्यात काही करता येणार नाही, असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले. त्यांनी इलेक्ट्रॉनिक रिपेरिंगचा आयटीआय केला. पण त्यातून घर चालत नव्हते. त्यांना घर चालवण्यात अडचणी येत होत्या.

उत्तमराव पहिल्यापासून शिवाजी महाराजांना मानत होते. शिवाजी महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले होते. त्यामुळे उत्तमरावांना यातून प्रेरणा मिळाली. त्यांनी जुन्नर ते रायगड अपंग असताना एम ८० वर प्रवास केला, ते पूर्ण रायगड चढले.

२००७ मध्ये त्यांनी कुक्कुटपालन व्यवसाय करण्याचे ठरवले. सुरुवातीला त्यांच्याकडे ४ हजारच कोंबड्या होत्या. आता हा आकडा जवळपास १६ हजारांवर पोहचला आहे. त्यांनी आता जरी उंचीचे शिखर गाठले असेल मात्र त्यांचा प्रवास हा खूप संघर्षमय होता.

ज्या प्रमाणे शिवाजी महाराजांना अनेकवेळा माघार घ्यावी लागली. शिवाजी महाराजांचे जवळपास सगळे किल्ले जिंकले गेले होते. पण शिवाजी महाराज यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी आपले सर्व किल्ले पून्हा मिळवले. ही गोष्ट खूप प्रेरणा देणारी आहे, असे उत्तमराव म्हणतात.

शिवाजी महाराजांमुळेच मी आजपर्यंत कधीही मागे वळून पाहिले नाही, असेही उत्तमराव म्हणतात. आज उत्तमराव एका महिन्याला अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळवतात. तसेच ते शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करत असतात. सोबतच ते शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करत असतात.

हे सगळे असताना त्यांना बायकोची खंबीर साथ मिळाली आहे. मी अपंग असताना, कोणीही माझ्याशी लग्न केले नसते. तसेच लग्न करायचे ठरले असते, तर अपंग मुलगी शोधावी लागली असती. पण संगीता माझी अशी परिस्थिती पाहूनही लग्नाला तयार झाली. आज आमचा संसार सुखाने सुरू आहे. शिवाजी महाराज आणि संगीताने माझ्या आयुष्यातील संघर्ष जिवंत ठेवला आहे, असे उत्तमराव म्हणतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.