नेमकं काय झालं होतं त्यादिवशी.. जाणून घ्या गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूदिवशीचा घटनाक्रम

0

शनिवार १२ डिसेंबर गोपीनाथ मुंडे  यांची जयंती. गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक दिग्गज नाव. गोपीनाथ मुंडे भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते होते. गोपीनाथ मुंडे यांनीच भाजपचा पाया महाराष्ट्रात भक्कम केला होता. आज भाजपचा महाराष्ट्रात जो वटवृक्ष वाढलाय, त्याचे श्रेय निर्विवादपणे गोपीनाथ मुंडेंनाच जाते.

३ जुन २०१४ ला त्यांचे निधन झाले होते. आज जाणून घेऊया त्यांच्या मृत्युच्या दिवशी नेमके काय झाले होते. २०१४ मध्ये कॉंग्रेसची सत्ता उलथवून केंद्रात भाजप सत्तेत आली होती, तेव्हा राज्यात भाजप सत्तेत असल्याने राज्यात मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चांना उधाण आले होते. यात दोन महत्वाची नावे होती, ती म्हणजे गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी.

मात्र त्यावेळी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने नितीन गडकरी यांच्यासह गोपीनाथ मुंडे यांनादेखील केंद्राच्या राजकारणात स्थान दिले होते, त्यामुळे राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार या चर्चा संपल्या होत्या.

भाजप सत्तेत आल्यानंतर २६ मे २०१४ ला त्यांनी मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतली होती, दिल्लीहुन महाराष्ट्रात येण्यासाठी निघाले होते. त्यासाठी ते दिल्लीहुन राज्यात येण्यासाठी विमानतळाकडे निघाले होते. मात्र अर्धा तासांचा हा प्रवास संपुर्ण महाराष्ट्राला धक्का देणारा होता.

दिल्लीतील निवासस्थान आणि विमानतळ हा अवघ्या अर्धा तासांच्या प्रवासात गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला आणि महाराष्ट्रासह भाजपने आपला एक दिग्गज नेता गमावला.

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ३ जून २०१४ ला ते सकाळी आपल्या २१ लोधी  इस्टेट या निवासस्थानाहून विमानतळाकडे जायला निघाले होते. त्यांच्यासोबत त्यांचा पीए आणि ड्रायवर होता. मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसलेले होते.

गोपीनाथ मुंडे यांची गाडी पृथ्वीराज-तुघलक रोडच्या इंटरसेक्शन असलेल्या अरबिंदो मार्गावर पोहचली. तेव्हा सकाळची ६ वाजून २० मिनिटे झालेली होती. त्यावेळी गाडी सिग्नलवर असताना मुंडेंच्या गाडीला एका इंडिका कारने जोरदार धडक दिली होती, मुंडेंच्या चेहऱ्याला जोरदार मार लागला होता.

त्यामुळे त्यांच्या पीए आणि ड्रायवरने त्यांना तातडीने एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्य़े दाखल केले. मात्र एम्समध्ये नेल्यानंतर तिथल्या डॉक्टरांच्या असे लक्षात आले की, गोपीनाथ मुंडे यांचे ह्रदय बंद पडले आहे. तेव्हा डॉक्टरांच्या टिमने त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, पण ते शक्य झाले नाही.

सकाळी ७ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी गोपीनाथ मुंडेंना मृत घोषित केले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर सर्व परिस्थिती भाजप नेते नितीन गडकरी यांनीच सांभाळली होती.

नितीन गडकरी महाराष्ट्राचे नेते असल्याने ही जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. गोपीनाथ मुंडेंच्या निधनाबद्दल माध्यमांना देखील नितीन गडकरी आणि हर्षवर्धन यांनीच सांगितले होते.

गोपीनाथ मुंडे यांच्या अशा अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांचा अपघात होता की, घातपात अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यासाठी सीबीआय चौकशी पण करण्यात आली होती, मात्र पुढे या प्रकरणावर पडदा पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.