कौतुकास्पद! कोरोनाकाळात गरजूंना हजारो डबे मोफत पोहोचवतात हे लोक, वाचा त्यांच्या कार्याबद्दल..

0

आज अनेक लोक आहेत जे कोरोनाकाळात गरजूंना मदत करत आहेत. आज आम्ही अशाच काही लोकांची कहाणी सांगणार आहोत जे लोक मदत तर करतात पण त्यांच्या मदतीची कोणालाही कल्पनाही नाही.

त्यांना कोठेतरी मान मिळाला पाहिजे यासाठी आज आपण त्यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत. नाशिकच्या रूग्णालयांमध्ये कोरोना बाधितांना तसेच त्यांच्या घरच्यांना मोफत डबा पुरवणारे अक्षय मोरे हे खुप मोलाचे काम करत आहेत.

त्यांनी आतापर्यंत अनेक लोकांना मोफत डबे पुरवले आहेत. ते म्हणाले की, अनेक रूग्ण हे ग्रामीण भागातून आले आहेत. तर काहींचे संपुर्ण कुटुंब कोरोनाबाधित झालं आहे. त्यांच्या घरी डबे करायला कोणीही नाही. डबे दिल्यानंतर अनेक लोक हात जोडतात.

आपण समाजासाठी काहीतरी करतोय याचं समाधान वाटतं असे ते म्हणाले. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट भयंकर आहे त्यामुळे गरजू लोकांना डबे पोहोचवण्याचे काम अक्षयसारखे अनेक लोक करत आहेत.

त्यामध्ये पुण्यातील आकांशा सडेकर आणि मुंबईमधील भालचंद्र जाधव यांचाही समावेश आहे. हे तिघेही वेगवेगळ्या शहरातील असले तरी त्यांचे काम सारखेच आहे. त्यांची भावना एकच आहे अडचणीत असलेल्या लोकांना मदत करायची.

नाशिकच्या एका फार्मा कंपनीमध्ये अक्षय काम करतात. नाशिकमध्ये कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे रूग्णांच्या जेवणाच्या समस्या वाढत होत्या. नाशिकच्या जिल्हा रूग्णालयात ग्रामीण भागातूनही अनेक रूग्ण येत होते.

अशा रूग्णांच्या रूग्णांना नातेवाईकांना डबे देणं शक्य होत नव्हतं. अशा रूग्णांना मोफत डबे देण्याचे काम अक्षय आणि त्यांची पत्नी करत आहे. दररोज १०० डबे पुरवण्याचे काम हे दोघे करतात. या महामारीत अनेक लोकांचे हाल झाले त्यामुळे आपल्याला मदत करायला हवी असं त्यांना वाटलं.

पत्नीसोबत याबबत त्यांनी चर्चा केली होती तिनेही होकार दिला. मग दोघांनी ही सेवा सुरु केली. उद्या माझ्यावरदेखील ही वेळ येऊ शकते त्यामुळे शक्य होईल तेवढी मी मदत करत राहील असे अक्षय म्हणाले.

इंग्लंडमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात स्थायिक असलेल्या आकांशादेखील पुण्यातील गरजू लोकांना डबा पुरवण्याचे काम करत आहेत. सहा एप्रिलपासून त्यांनी त्यांच्या मैत्रिणीसोबत या कामाला सुरूवात केली होती.

आतापर्यंत त्यांनी १२५० गरजूंना डबे दिले आहेत. आकांशा म्हणतात की, लहानपणापासूनच मला इतरांना मदत करण्याची आवड होती. यावेळी कोरोनाच्या काळात अनेक लोकांचे हाल झाले हे मी पाहिले.

मला त्यांना मदत करावी असे वाटले. आम्ही ज्यांना डब्याची नितांत गरज आहे त्यांना डबे पुरवतो. हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या आणि होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांना आम्ही मोफत डबे पुरवतो.

यापलिकडे अनेक लोक आम्हाला डब्यांची विचारणा करतात. त्यामुळे ज्यांना डब्यांची गरज आहे आणि जे लोक पैसे देऊ शकतात अशांना आम्ही डबे पुरवणाऱ्या खानावळींचे नंबर देतो, असे आकांशा म्हणाल्या आहेत.

मुंबईच्या परळ भागात होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांना मोफत डबा देण्याचे काम भालचंद्र जाधव करतात. त्यांचा केटरींगचा बिझनेस आहे. परळ, शिवडी, वडाळा भागात ते मोफत डबे पोहोचवत आहेत.

गेल्या वर्षी त्यांना व्यवसायात तोटा झाला तरी त्यांनी हे काम हाती घेतले आहे. इच्छा असेल तिथे मार्ग निघतो असे त्यांचे म्हणणे आहे. गरजूंना मदत करता येते याचे समाधान आहे. लोक डबा मिळाल्यानंतर हात जोडतात ते पाहून डोळ्यात पाणी येते. इतर लोकांनीही आपल्या परीने मदत करायला हवी, असे आवाहन भालचंद्र यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.