कसाबसमोर असून पण घाबरला नव्हता हा ‘छोटू चायवाला’; नजरेला नजर भिडवत वाचवले अनेकांचे जीव

0

 

गुरुवारी २६/११ हल्ल्याला १२ वर्षे पूर्ण झाली. २६ नोव्हेंबर २००८ साली मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याच्या थरकाप उडवणाऱ्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहे.

दहशतवाद्यांनी ताज हॉटेल आणि ट्रायटेंड हॉटेल बरोबरच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. यात अनेक पोलिसांनाही वीरमरण आले होते. पण तिथे एक छोटू चायवाला होता, त्याने अनेक लोकांचे प्राण या हल्ल्यात वाचवले होते.

छोटू चायवाला उर्फ मोहम्मद तौफिक शेख आजही CSTM वर चहा विकतो. जेव्हा पण त्याला २६/११ चा दहशतवादी हल्ला आठवतो, तेव्हा आजपण कसाब त्याच्या डोळ्यासमोरुन जात नाही.

मोहम्मदने त्या दिवशी नेमके काय झाले होते, हे सांगितले आहे. गीतांजली एक्सप्रेस बरोबर ९ वाजून ५१ मिनिटांनी सुटली आणि अवघ्या एक मिनिटांनी पाकिस्तानी दहशदवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने छत्रपती शिवाजी टर्मिनल्स येथे AK ५६ या अत्याधुनिक स्टेनगनने निष्पाप रेल्वे प्रवाश्यांवर अंधांधूद गोळीबार सुरू केला.

काही मिनीटात स्टेशनवर प्रेतांचा खच पडला, रक्ताच्या थारोळ्यात अनेक जखमी लोक पडले होते. गोळीबाराचा आवाज सुरु होता. लोक सैरावैरा धावत होते.

तेव्हा पंचविशी पार केलेल्या छोटू हा सेंट जॉर्ज हॉस्पिटल पुढे चहा विकत होता. त्याने गोळीबाराचा, प्रवाशांचा आक्रोश ऐकला आणि लगेचच रेल्वे स्टेशनवर धाव घेतली. आतमध्ये शिरताच, स्टेनगनधारी दोनजण प्रवाशांवर अंधाधूद गोळ्या झाडताना त्याने पाहिले. पण मोहम्मद घाबरला नाही.

संपुर्ण ताकत एकवटत, छोटुने जीवाची पर्वा न करता, रक्त्याच्या थारोळ्यात पडलेल्या लोकांना उचण्यास सुरुवात केली. कसाबने छोटूला बघीतले, त्याला शिव्या दिल्या, त्याच्या दिशेने फायरसुध्दा केलं, मात्र छोटू थोडक्यात बचावला. छोटू जखमींना उचलून बाजूला सेंट जॉर्ज रुग्णालयात घेऊन जात होता. काही जणांना हातगाडीने तर काही जणांना उचलून तो घेऊन गेला.

खाली पडलेल्या प्रवाशांना छोटू उचलत असल्याच्या हालचाली स्पष्टपणे जाणवत होत्या. अनेक जखमींना टॅक्सीत टाकलं. जखमींना नेता नेता आपले कपडे रक्ताने भरलेले होते, याचे भान छोटूला नव्हते. यातील आठ ते नऊ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केले होते. त्या जखमींचे प्राण वाचवता आले नाही याचे दुःख छोटूच्या मनात कायम आहे. मात्र अनेकांचे प्राण वाचवता आले याचे समाधान घेऊन तो जगतो आहे.

प्रत्येक माणसामध्ये एक सैनिक लपला असतो. अशा वेळी राष्ट्रासाठी काहीतरी करून जाण्याचा विश्वास माझ्यामध्ये आला. मी मदत करु शकलो ही माझ्या जीवनातील सर्वात मोठी आणि अविस्मरणीय बाब आहे, असे छोटू चायवाला सांगतो.

जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर छोटूने सर्व पोलिसांना चहा दिला. त्या रात्री छोटुने अनेक लोकांची मदत केली होती, प्राण वाचवले होते, त्यामुळे अनेक लोक त्यांच्या नातेवाईकांचे प्राण वाचवल्याबद्दल छोटुचे आभार मानतात.

या घटनेनतंर छोटूच्या कामगीरीचे खूप कौतूक झाले. राज्यपालांनीही त्याचा गौरव केला, लहान मोठा अशा २७ पुरस्कारांनी छोटू चायवाल्याला सन्मानित करण्यात आले आहे. आजही छोटू त्याच स्टेशनवर चहा विकत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.