किरण गवते: ऑफिस बॉय असताना झाला होता अपमान, आता करतोय लाखोंची उलाढाल

0

 

 

शिक्षण पूर्ण करणे एखादी नोकरी करणे आपले घर सांभाळणे, इतकं साधा आयुष्य मध्यम वर्गीय लोकांच असतं. त्यात ऑफिसमध्ये काम करताना अनेक अडचणी येतच असतात, अशात आपली परिस्थिती बदलणे हे जरा कठीण असते.

अशा परिस्थितीत स्वतःचे पूर्ण जीवन बदलून टाकणाऱ्या संधी आपल्याला मिळत असतात, मात्र त्या संधी आपल्याला ओळ्खत्या आल्या पाहिजे, मग ती संधी तुमचा एखादा अपमान देखील असू शकते, थोडं विचित्र वाटलं असेल पण हे खरंय.

बीड मधल्या एका मुलाने जो की ऑफिस बॉयचे काम करत होता, त्याने अपमानमुळे असे काही करून दाखवले की आता तो महिन्याला लाखो रुपये कमावतो आहे. किरण गवते असे त्या मुलाचे नाव आहे.

६ वर्षाचा असताना वडील वारले, घरात तीन भावंड. घराचे छत्र हरवले होते. त्यामुळे किरण यांना शाळेत असल्यापासूनच कामाला जावे लागले. यातच त्यांनी आपले दहावीचे शिक्षण पूर्ण  केले. त्यानंतर शिक्षण सुरू असतानाच त्यांनी एक ऑफिस बॉय म्हणून कामाला लागले.

सुरुवातीला किरण यांनी पगार नसताना ३-४ ते वर्ष काम केले. तिथे त्यांना फक्त शिकायला मिळत होते. त्यानंतर किरण यांना अडीच हजार रुपये प्रतिमाहिना मिळण्यास सुरुवात झाली. परिस्थितीनुसार पगार खूप कमी होता मात्र पर्याय नसल्याने ते काम किरण करत होते.

त्यानंतर किरण यांनी आपले कौशल्य वाढवले, आणि एक प्रॉपर डिझायनर म्हणून त्यांची ओळख निर्माण करू लागले. त्यामुळे महिन्याचे उत्पन्न २५ ते ३० हजार रुपयांवर आले होते.

किरण यांचे आपले दैनंदिन काम सुरू होते, पण कुठे तरी त्यांना त्यांचे एक वेगळे अस्तित्व निर्माण करायचे होते. अनेकदा ऑफिसमध्ये असताना ऑफिस व्यतिरिक्त कामे त्या कंपनीच्या मालकाच्या सांगण्यावरून त्यांना करावी लागायची. या कामांमुळे त्यांचा अनेकदा संताप होयचा. यामुळे अनेकदा किरण यांची मनस्थिती खालावली जायची.

शेवटी किरण यांना त्यांचा पूर्ण आयुष्य बदलवून टाकणारा क्षण आला. एकदा त्यांना कंपनीच्या मालकाने एक काम सांगितले मात्र ते सुट्टीवर असल्याने ते काम होऊ शकले नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी ऑफिसवर आल्याने किरण यांना खूप बोलणी बसली. खूप अपमान सहन करावा लागला. इतकेच नाही तर किरण यांना त्या ऑफिसमधून काढून टाकण्यात आले होते, हे कुठे तरी किरण यांच्या मनाला लागले.

त्यानंतर त्यांनी आपले स्वतःचे ऑफिस उभे करण्याचा विचार केला. यासाठी पैसे कुठून येतील याचा विचार त्यांनी केला नव्हता मात्र त्यांच्यात जिद्द होती, ती म्हणजे स्वतःचे अस्तित्व तयार करण्याची. त्यांनी एका ठिकाणी ऑफिससाठी जागा बघितली.

तिथे त्यांनी आपल्या खिशातले सर्व पैसे म्हणजेच गेल्या १४ ते १५ वर्षात जेवढे पैसे कमावले होते, ते पूर्ण त्या जागेसाठी लावून दिले आणि किरण यांनी आपले ऑफिस उभे केले. त्या ऑफिसचे नाव त्यांनी ‘ब्रँड मेकर’ असे ठेवले, आणि तिथून त्यांच्या खऱ्या व्यवसायाला सुरुवात झाली.

किरण यांनी ऑफिसला सुरुवात केली होती, मात्र सुरुवातीला किरण यांना कामे मिळत नव्हती. त्यांनी उभे केलेले ऑफिस आता बंद होण्याची वेळ येते की काय अशी स्थिती निर्माण झाली होती, मात्र त्यांच्यात ऑफिस चालवण्याची आणि आपले नाव मोठे करण्याची जिद्द होती.

किरण हे दिवसरात्र काम करत होते, मेहनत घेत होते, त्यामुळे आता त्यांचा व्यवसाय भरभराटीला आला होता. किरण यांची आता एक वेगळी ओळख झाली आहे. त्यांना मोठमोठ्या शहरातून कामे येऊ लागली आहे. आता किरण यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

असा होता ऑफिस बॉय ते एक व्यवसायिक किरण गवते यांचा प्रवास. सध्या किरण गवते यांचा टर्न ओव्हर ७० ते ८० लाख रुपये इतका आहे. मेहनत, जिद्द, चिकाटी, आणि कधी न हार मानणारे मन असेल तर तुम्ही कितीही मोठ्या असणाऱ्या यशाची उंची गाठू शकतात, असे किरण गवते यांनी दाखवून दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.