जेव्हा गोपीनाथ मुंडे यांनी जवळपास भाजपला रामराम ठोकला होता, तेव्हा…

0

 

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोड चिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. पक्षातील काही नेत्यांनी आपल्यावर अन्याय केल्याचा आरोप एकनाथ खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी केला होता. असेच काहीसे काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतही घडले होते.

भाजपच्या अंतर्गत राजकारणामुळे गोपीनाथ मुंडे देखील भाजप सोडणार होते. ते भाजपला सोड चिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश घेणार होते. त्यासाठी त्यांनी काँग्रेस नेत्यांसोबत बैठकादेखील घेतल्या होत्या पण एका गोष्टीमुळे त्यांनी भाजप मध्येच  राहण्याचा निर्णय घेतला, जाणून घेऊया गोपीनाथमुंडे यांच्या त्या प्रसंगाबद्दल.

हा किस्सा २०११ या सालचा आहे. तेव्हा गोपीनाथ मुंडे हे राजकारणात खूप सक्रिय नेते होते. मात्र त्यावेळी गोपीनाथ मुंडे विरुद्ध नितीन गडकरी असा एक वाद भाजपच्या अंतर्गत राजकारणात होता.

खरं म्हंटल तर या वादाला सुरुवात तेव्हा झाली जेव्हा २००९ साली नितीन गडकरी यांची निवड भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर करण्यात आली. त्यामुळे सगळी सूत्रे गडकरी यांच्या हाती गेली.

गोपीनाथ मुंडे हे राजकारणात सक्रिय नेते होते, तरीही त्यांना आता कुठेतरी पक्षात डावलले जात आहे, पक्ष दुर्लक्ष करत आहे, असे काही आरोप मुंडे यांच्या समर्थकांकडून लावले जात होते.

या वादात आणखी भर पडली ती २०११ साली. जेव्हा पुणे भाजप शहराध्यक्षपदाची निवड करण्यात आली तेव्हा पक्षाने शहराध्यक्षपदी विकास मटकरी यांची निवड केली. मात्र मुंडे आणि त्यांच्या समर्थकांची इच्छा अशी होती की, हे पद योगेश गोगावले यांना देण्यात यावे, मात्र असे झाले नसल्याने मुंडे पक्षावर आणखी नाराज झाले होते.

गोपीनाथ मुंडे यांची यंदाची नाराजी तीव्र होती. पक्षातील काही नेत्यांनी मुंडे यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते यावेळी शक्य झाले नाही. नितीन गडकरी यांच्याकडे सगळी सूत्र असल्याने आपल्याला आता पक्षात किंमत दिली जात नसल्याची भावना मुंडे यांच्यात निर्माण झाली होती.

त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी भाजप सोडण्याचा निर्णय घेतला असावा, असे त्यांचे समर्थक म्हणतात. त्यामुळे मुंडे यांनी नेत्यांच्या भेटीगाठीदेखील सुरू केल्या होत्या. सगळ्यात आधी त्यांनी विलासराव देशमुख यांनी भेट घेतली होती. त्यामुळे मुंडे लवकरच काँग्रेस पक्षात प्रवेश घेणार, अशा चर्चांना तेव्हा उधाण आले होते.

तसेच त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना केंद्रात दोन मंत्रिपदं आणि राज्यात दोन मंत्रिपदं दिले जातील, अशा चर्चाही त्यावेळी होत्या. तेव्हा त्यांनी नेत्यांशी भेटी घेतल्या त्यात एक महत्वाचे नाव होते ते म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे.

गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली सगळी खदखद बाळासाहेबांसमोर मांडली. यावर बाळासाहेबांनी मुंडे यांचे पूर्ण एकूण घेतले. मात्र जाता जाता बाळासाहेबांनी मुंडे यांना भगवा टिळा लावला, आणि तुमच्या कपाळावरती हा भागवाच शोभून दिसतो, असे बाळासाहेबांनी मुंडे यांनी सांगितले.

तसेच तुम्ही भाजप सोडून कुठेही जाऊ नका, असा सल्लाही बाळासाहेबांनी मुंडे यांना दिला. बाळासाहेबांचा हा सल्ला गोपीनाथ मुद्दे यांनी ऐकला. त्यानंतर त्यांनी दिल्लीला जाऊन पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि सुषमा स्वराज यांची भेट घेतली. त्यानंतर मुंडे यांची नाराजी काही प्रमाणात दूर झाली होती. त्यानंतर मुंडे यांनी पक्ष बदलण्याचा आपला मागे घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.