आडनाव सुचत नव्हतं, तेवढ्यात कोणीतरी दरवाजा ठोठावला आणि धनंजय माने जन्माला आले

0

मराठी चित्रपटसृष्टीत सर्वात जास्त गाजलेला जर कोणता चित्रपट असेल तर तो आहे अशी ही बनवा बनवी. आजही हा चित्रपट टीव्हीवर लागला की सगळे लोक आवडीने पाहतात. आजही हा चित्रपट तितकाच पोट धरून हसायला लावतो.

यातील सगळ्याच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळेच घर केले आहे. अभिनेते सचिन पिळगावकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये मुख्य भुमिकेत अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, प्रिया अरूण, सुप्रिया पिळगावकर आणि स्वता सचिन पिळगावकर होते.

इतरही बऱ्याच कलाकारांनी यामध्ये उत्तम अभिनय केला आहे. त्यातील काही डायलॉगही खुप गाजले. जसे की आमच्या शेजारीच राहते, नवऱ्याने टाकलंय तिला.., सारखं सारखं एकाच झाडावर काय?, सत्तर रूपये वारले, असे अनेक डायलॉग आजही आपल्याला कोणाच्यातरी तोंडातून ऐकायला मिळतील.

पण चित्रपटातील एक डायलॉग हा खुपच गाजला. तो म्हणजे, धनंजय माने इथेच राहतात का? अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांनी म्हणलेला हा डायलॉग प्रचंड गाजला. चित्रपटाला आज जवळपास ३२ वर्षे पुर्ण झाली असली तरी त्याची लोकप्रियता आजही कायम आहे.

मात्र या चित्रपटाशी निगडीत एक भन्नाट किस्सा आहे. सुरूवातीला निर्माते आणि दिग्दर्शकांना पात्रांना आडनावे काय द्यायची हेच सुचत नव्हतं. तेव्हा एक अशी घटना घडली की त्यावरून पात्राला आडनाव मिळाले.

अभिनेता किरण माने यांनी हा किस्सा सांगितला आहे. किरण माने यांनी फेसबूकवर पोस्ट करत हा किस्सा सांगितला. त्यांनी लिहीले आहे की, खरंतर यापूर्वी या पात्रासाठी आडनावाची गरज जाणवली नाही.

पण परशा जेव्हा दार ठोठावतो, तेव्हा त्यानं पूर्ण नांव घ्यायची गरज आहे. त्याला कुठलं आडनांव शोभेल? याचा सचिन पिळगांवकर आणि वसंत सबनीस वगैरे लोक व्ही. शांताराम यांच्या ऑफीसमध्ये विचार करत बसले होते.

बरीच आडनांवं सुचत होती पण कुणाचं समाधान होत नव्हतं. एवढ्यात व्ही. शांताराम दाराकडे पाहून म्हणाले, “या या माने.. काय काम काढलंत?” व्ही. शांताराम यांचे सी.ए. किसन माने आले होते.

त्यांना काही कागदपत्रांवर व्ही. शांताराम यांच्या सह्या हव्या होत्या. ‘त्या’ हाकेनं चर्चेच्या वेळी असं टायमिंग साधलं होतं की त्यांच्या सह्या होईस्तोवर सचिनजी आणि वसंत सबनीसांनी ठरवून टाकलं की त्या पात्राचं आडनाव ‘माने’ हेच असेल.

मिटींग संपता-संपता व्ही. शांताराम यांनी किसन मानेंना पुन्हा त्यांच्या केबिन मध्ये बोलावून घेतले आणि हसत-हसत विचारलं की “माने तुमचं आडनाव आमच्या सिनेमातल्या ‘धनंजय’ या पात्राला वापरायला तुमची काही हरकत नाही ना?” केबिनमध्ये हास्यकल्लोळ उसळला.

या घटनेनंतर संपूर्ण मराठी मुलखात हास्यकल्लोळ उसळवणारा तो ‘अजरामर’ डायलॉग जन्माला आला “धनंजय माने इथेच रहातात का?” तुम्हाला हा किस्सा कसा वाटला आम्हाला कळवा. जर हा किस्सा आवडला असेल तर पुढे पाठवायला विसरू नका.

Leave A Reply

Your email address will not be published.