अमन यादव: या तरुणाने स्वतःच्या बाईकचे रूपांतर केले रुग्णवाहिकेत अन देतोय रुग्णांना मोफत सेवा

0

 

आजकाल स्वतःचा फायदा न बघता, दुसऱ्यांची मदत करणारे लोक खूप कमी बघायला मिळतात. आज जाणून घेऊया एका अशा तरुणाबद्दल ज्याने आपले पूर्ण आयुष्य गरजूंसाठी समर्पित केले आहे.

उत्तर प्रदेशातील वाराणसीच्या अमन यादव नावाच्या तरुणाने आपल्या दुचाकीला रुग्णवाहिका म्हणून वापरण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे अनेक गरजूंना अमनची मदत मिळत आहे. तो दिवसरात्र गरजू लोकांच्या मदतीला धावून येत आहे.

अमन वारणसीचा राहणारा आहे. वाराणसीत जेव्हा कोणाला रुग्णवाहिकेची गरज भासते, अमन तिथे येऊन लोकांची मदत करतो. अमनच्या या कामामुळे पूर्ण वाराणसीत त्याने आपली एक ओळख निर्माण केली.

अमनने रुग्णवाहिका सुरू करण्यामागे पण एक गोष्ट लपलेली आहे. एकदा अमन सरकारी दवाखान्यात गेला होता. तेव्हा त्याने पाहिले की रुग्णांकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. अनेक रुग्णांना उपचाराची गरज दिसत होती, पण तिथे सुविधा उपलब्ध नव्हत्या.

दवाखान्याच्या बाहेर एक वृद्ध महिला बेशुद्ध पडलेली होती, हे पाहून अमनला खूप वाईट वाटले. तेव्हा त्याने त्या महिलेच्या मुलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिच्या पाच मुलांपैकी एकानेही त्या महिलेला ओळखले नाही.

अमनने त्या महिलेच्या उपचाराची जबाबदारी उचलली, मात्र अमन त्या महिलेला वाचवू शकला नाही. महिलेच्या पोस्टमार्टमनंतर तिची सोन्याची अंगठी आणि चैन घेण्यासाठी तिची मुलं आली. या घटनेमुळे अमनला खूप वाईत वाटले. तेव्हापासून त्याने कुठल्याही गरजू व्यक्तीला आपण मदत करायची हे ठरवले.

२०१३ मध्ये अमन लोकांना पायी जाऊनच मदत करायचा. तेव्हा अमनला लोक ओळखायला लागले होते. ज्याला कोणाला मदतीची गरज पडेल, तो अमनशी संपर्क साधायचा. २०१५ मध्ये राजीव वर्मा नावाच्या एका व्यापाऱ्याने अमनला जुनी दुचाकी घेऊन दिली. तेव्हा अमनने त्याच दुचाकीला रुग्णवाहिकेत बदलले.

दुचाकीच्या आत त्याने सगळ्या अत्यावश्यक गोष्टी ठेवलेल्या आहे. गोळ्या औषधे, मलम पट्टी यांसारखी अत्यावश्यक सामग्री त्याने आपल्या दुचाकीत ठेवली आहे. त्याच्याकडे फर्स्ट एडकिट देखील आहे. त्यामुळे सुरुवातीला तो लोकांवर प्रथोमोचार करतो आणि त्यानंतर त्या रुग्णांना दवाखान्यात घेऊन जातो.

कोरोनाच्या संकटात अनेक डॉक्टर कोरोनाच्या भीतीने रुग्णांवर उपचार करणे टाळत होते. मात्र तरीही अमनने आपले काम थांबवले नाही. त्याने लॉकडाऊनमध्ये रुग्णांची सेवा केली आहे. अनेकदा लोकांनी त्याला या मदतीचे पैसे दिले आहे, मात्र त्याने लोकांना मदत करणे आपले कर्तव्य आहे, असे म्हणत पैसे घेतले नाही.

आज अनेक गरजू लोकांना आपल्या मदतीची गरज असते. त्यांना आपण मदत केली पाहिजे. आज फक्त तरुणांनीच नाही तर प्रत्येकाने गरजू लोकांना आपला फायदा तोटा न बघता मदत केली पाहीजे, असे अमनने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.