नाशिकचा पठ्ठ्याचा कमाल! गाडी न्यूट्रल केली तर बंद होणार अन् क्लच दाबला की सुरू होणार

0

 

आपण अनेकदा सिग्नलवर थांबल्यावर किंवा कोणताही ठिकाणी काही वेळ थांबायचे असेल तर आपली गाडी सुरूच ठेवतो. अशात न कळत आपले बरेच पेट्रोल वाया जाते.

सध्या पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने असे पेट्रोल वाया जाणे आपल्याला परवडणारे नाही, यावर उपाय काढणे गरजेचे आहे, असे म्हणत नाशिकच्या एका पठ्ठ्याने थेट याच्यावरच उपाय शोधला आहे.

नाशिकचा युवा अभियंता असलेल्या या युवकाचे नाव अक्षय बोडके असे आहे. त्याने एक असे यंत्र तयार केले आहे, जे कुठल्याही वाहनाला जोडले असता, ते वाहन जर न्यूट्रल केले तर पाच सेकंदात वाहन बंद होते.

२०१२ पासून अक्षय त्याचे संशोधन करत होता. त्याच्या या संशोधनाला यश मिळाले असून त्याच्या या संशोधनाबद्दल त्याला राष्ट्रीय स्तरावरील पेटंट देखील देण्यात आले आहे.

अक्षयचे शालेय शिक्षण रचना विद्यालयातून झाले आहे, तर दहावीनंतर त्याने संगमनेर येथील अमृतवाहिनी पॉलिटेक्निक महाविद्यालयातुन पदवीचे शिक्षण घेतले आहे.

त्यानंतर त्याने हे यंत्र बनवण्याच्या संशोधनाला सुरुवात केली होती. वाहन उभे असेल तर न्यूट्रल करताच गाडी बंद व्हावी आणि क्लच दाबताच गाडी पून्हा सुरू व्हावी असे यंत्र त्याला बनवायचे होते. हे यंत्र बनवण्यास त्याला तब्बल ८ वर्षे लागली आहे.

सध्या काही कंपन्यांच्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांमध्ये अशा प्रकारचे उपकरण बसवण्यात आले आहे. पण ही संकल्पना जेव्हा अक्षयने मांडली होती, तेव्हा दुचाकीमध्ये ही संकल्पना अस्तित्वात नव्हती.

आता अक्षयने तयार केलेले हे यंत्र कोणत्याही वाहनाला बसवल्यास याचा उपयोग करता येऊ शकतो. तसेच हे यंत्र दुचाकी, चारचाकी आणि ट्रक अशा सर्व प्रकारच्या वाहनांना उपयोगी पडणारे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.